
चिखली (प्रतिनिधी): बुलढाणा जिल्ह्यातील बांधकाम कामगारांचे नवीन नोंदणी, नुतनीकरण व लाभाचे अर्ज महिनो-महिने प्रलंबित असल्याने कामगार हवालदिल झाले आहेत. याबाबत शिवसेना बांधकाम कामगार सेनेने सरकारी कामगार अधिकारी, बुलढाणा यांना निवेदन देऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. अन्यथा लोकशाही पद्धतीने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्हाध्यक्ष सागर नारायण झगरे यांच्या नेतृत्वाखाली 27 मे 2026 रोजी कामगार अधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, जानेवारी महिन्यापासून कामगारांचे अर्ज प्रलंबित आहेत.
निवेदनातील प्रमुख मुद्दे:चिखली तालुका जवळपास वर्षभरापासून नुतनीकरण ठप्प आहे. संगणक प्रणाली फक्त काही दिवस चालते व बाकी दिवस बंद असते.
पडताळणीला विलंब ऑनलाइन अर्ज सादर केल्यावर कागदपत्र पडताळणीसाठी 6 महिन्यांनंतर तारीख मिळते.मोबाईल नंबर समस्या नोंदणीवरील मोबाईल क्रमांक बंद पडल्यास बदलण्यासाठी 15-20 दिवस लागतात तर कधी होतच नाही.
मेहकर व सिंदखेड राजा तालुका ग्रामसेवक 90 दिवसांचे प्रमाणपत्र देत नसल्याने नोंदणी व नुतनीकरण रखडले आहे. ठेकेदाराचे दाखले दिल्यास अर्ज नामंजूर केले जातात.
विनाकारण नामंजुरी: पडताळणी झाल्यावरही त्रुटी दाखवून अर्ज नामंजूर केले जातात. त्यामुळे कामगारांना वारंवार ऑनलाइन खर्च करावा लागतो.
वेळेवर लाभ न मिळाल्याने कामगार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सर्व प्रक्रिया सुलभ करून कोणताही कामगार लाभापासून वंचित राहणार नाही, अशी व्यवस्था तातडीने करावी, अशी मागणी सेनेने केली आहे.
यावेळी विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थित होते. कामगारांच्या प्रश्नांची तातडीने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असे जिल्हाध्यक्ष सागर झगरे यांनी सांगितले.
